उपळा मर्डर केस भाग - २

परिस्थिती कशीही असली तरी जीवन-मरण कुणाला चुकले आहे का ? प्रपंच तर करावाच लागतो. उपळ्याला मोठा बाजार बार्शीचा. त्यामुळे शाळा, दवाखाना , तहसील कोर्ट सबकुछ बार्शी. त्यामुळे वर्षभर कष्ट करून पिकलेला माल बार्शीच्या आडतीला लागायचा आणि त्यातून मुलाबाळांची लग्न आणि इतर व्यवहार व्हायचे.
२९ एप्रिल, १९४८ सकाळची वेळ. नेहमीप्रमाणे गावकऱ्यांनी बैलगाड्या जुंपल्या त्या वर्षी पाऊस चांगला असल्याने शेंगा भरपूर पिकल्या. गाडीत घालून येडशीला न्यायच्या , आणि तेथून माल मोटारीने बार्शीला जायचा. गाड्या जुंपल्या की पोरं माग लागायची. मला बी यायचय .कोण स्वतःची गाडी घेऊन निघालेले होते तर कोणी दुसऱ्याच्या गाडीवर नोकरीला होते. चंद्रकांत गणपत नायकल हा सांज्याचा पोरगा शिकायला आपले मामा दगडू पडवळाकडे होता. चंदू मागे लागला म्हणून मामाने त्याला सोबत गाडीत घेतले. गाडीत प्रभू यशवंत तोडकर ,शंकर अंबादास सावळकर ,राजाराम सोलापुरे अशी १४-१५ वर्षाची पोरं गाडीत बसून निघाली. 
           बंदोबस्तात गाड्या आजच्या गडपाटीच्या कमानीजवळ आल्या तसे एका बैलगाडीचे एटन तुटले ,मोटर गाडीचे व्हील अलाईनमेंट एकदमच बिघडल्यावर गाडी चालवायची कशी ? तीच अवस्था झाल्याने उपळ्याच्या ७ ही गाड्या तिथेच थांबल्या.
याच वेळी उस्मानाबाद चे कलेक्टर म्हणजे त्या वेळचे तालुकदार महंमद हैदरीचा ताफा तिथे आला. शिपाई अहमद खान मागे बसलेला तर जीपचा चालक गुलाम रसूल शांतपणे गाडी चालवत होता. तेवढ्यात गाड्या दिसताच हैदरने आदेश दिला, " गाड्या रोक दो ! "गाडी थांबताच मोहमंद खान आणि झामन खान हे लाईन इन्स्पेक्टर धावत पुढे आले. "कौन से गाव कि गाडी है ? " मुरलीधर देशमुख यांनी सांगितले की," उपळे की है । " भारत सरकारकडे असल्याने उपळ्याच्या लोकांवर वचक बसवणे निजाम प्रशासनाला अवघड झाले होते . त्यातच बस फोडून उपळ्याच्या पोरांनी सरकारला आव्हान दिले तरी त्यांना पकडणे शक्य नव्हते. त्यामुळे पोलिस , रजाकार , नाकेदार असा सर्वांचाच दात होता. 
         महमंद हैदरने आदेश दिला, " इनको पकडके ठाणे ले जाओ " जिल्ह्याच्या कलेक्टरने आदेश दिला म्हटल्यावर एकाहून एकजण पुढे आले. बारा गा डीवानांना अटक करण्यात आली. पूर्वीची परिस्थिती बरी होती .मात्र १९४८ ला निजामाच्या लोकांनी सर्वत्र हैदोस घातला होता . करोडगिरीनाके म्हणजे लूटमारीच्या अड्डे झाले होते. त्या ठिकाणी पठाण, रोहिले , रझाकार मन मानेल तसे वागत होते. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी कस्टमचे एसपी मोहम्मद खान यांनी तर सुलतानशाही कारभार सुरू केला होता. कलेक्टर महंमद हैदरने गाडीवाल्यांना अटक करण्याचा आदेश देताच त्यांनी आपले हात धुऊन घेतले. पठाणांनी गाडीला चारी बाजूंनी घेरले. तसेच ढोराचा शंकर सावळकर मोठ्याने रडायला लागला. तर नायकलचा चंदू आपले मामा दगडू पडवळाच्या धोतराला धरून थरथर कापायला लागला. मुरलीधर देशमुख आणि इतरांना काही कळायच्या आत बेड्या ठोकल्या. उपळ्याच्या ७ बैलगाड्या गडाच्या माळावर राहिल्या तर कस्टमच्या पठाणांनी उपळ्यांच्या १२ गाडीवानांना जबरदस्तीने मोटारगाडीत कोंबले. कलेक्टरच्या सोबत १०-१२ गाड्यांचा ताफा होता.


१९४८चे हैदराबाद संस्थानाचे वातावरण खूपच तापलेले होते . त्यामुळे प्रशासनातील खालचा वर्ग जरा जास्तच भडकला होता . उपळ्याच्या गाडीवानाचे दुर्दैवी एवढे विचित्र होते की ,गडावर अटक केल्यानंतर त्या बिचाऱ्या पोरांची नेमके काय झाले हे निश्चितपणे कधीही पुढे आलेली नाही. सर्व काही जर आणि तरच्या गोष्टी आहेत ज्यांच्या काळात ज्या घटना घडल्या त्यांना स्वतः याविषयी निश्चितपणे सांगता येत नसेल तर बाकीच्यांची काय कथा ? स्वातंत्र्यानंतर उपळ्याच्या गाडीवानांची केस उस्मानाबादच्या न्यायालयात उभी राहिली होती , त्यामध्ये अनेक मुद्दे पुढे आले आणि त्यानुसार अनेक बाबींवर चर्चा झाली त्यातून ज्या काही बाबी पुढे आल्या त्यानुसार सत्यता पडताळून ऐतिहासिक विश्लेषण करावे लागणार आहे. 

 कस्टम पठाणांनी गाडीवाल्यांना पकडून उस्मानाबादला आणले या ठिकाणी आल्यानंतर त्यांना ओळख परेडसाठी त्यांच्या पाहुण्यांच्या घरी नेण्यात आले पाहुण्यांनी पोलिसांच्या भीतीने त्यांना ओळखले नाही .तेव्हा या निरपराध मुलांना आजच्या ज्ञानेश्वर मंदिरामागील माळावर नेऊन गोळ्या घातल्या.बैलगाड्या नेमक्या कुठे गेल्या हे निश्चित नाही. 

  उपळ्याचीची घटना घडली ती तारीख होती २९ एप्रिल १९४८. यावेळी पोलिसांच्या विरोधात तक्रार नोंदवायची कुणी ? सोलापूरचे कलेक्टर संभाजीराव घाटग्यानी घटनेचा अहवाल मुंबईला पाठवून सरकारला माहिती दिली होती . परंतु त्यावेळी निजाम आणि भारत सरकारचे संबंध गरम होते . हैद्राबादचे विलीनीकरण झाले आणि उस्मानाबादचे कलेक्टर महमंद हैदरला १८ सप्टेंबर १९४८ ला सेवामुक्त करण्यात येऊन उस्मानाबादच्या जेलमध्ये टाकण्यात आले. तेव्हा उपळेकरांना त्यांना आपल्या मुलाची आठवण येणे स्वाभाविक होते .त्यानुसार स्थानिक राजकारणी माणिकराव पडवळाच्या मदतीने गावकऱ्यांनी उस्मानाबादचे पुढारी फुलचंद गांधी ,उद्धवराव पाटील ,नरसिंगराव देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्या सल्ल्यानुसार २४ जानेवारी, १९४९ ला उस्मानाबादचे कलेक्टर महंमद हैदरच्याविरोधात केस ठोकली. 

 त्यानुसार उस्मानाबादच्या कोर्टात महमंद हैदरवर कलम २४३, ६६ आणि ३३० एच.पी.सी.नुसार खटला सुरू झाला.त्यावेळचे नामांकित वकील नरसिंगराव देशमुख यांना घ्यावी म्हणून प्रयत्न केले , परंतु हैदरची केस कोणीही घेऊ नये अशा प्रकारचा ठराव इथल्या बार कौन्सिलने मांडल्यामुळे उस्मानाबादचा कुठलाही वकील मिळाला नाही. तेव्हा हैदराबाद चे प्रसिद्ध वकील काझी अब्दुल कयामखानला दर दिवशी ५० रुपयांची फी देऊन आणण्यात आले होते. त्या वेळी उस्मानाबाद जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश जसवंतराव होते.या केसमध्ये एकूण २१ कागदपत्रे आणि ४२ साक्षीदारांनी आपल्या साक्षी नोंदवल्या. 

त्यानुसार शिंगोलीच्या नारायण महाराने साक्ष देताना सांगितले की , घटनेच्या दिवशी ४ रोहिले, तीन बैलगाड्यातून ४ लोकांना उस्मानाबादकडे पकडून घेऊन चालले होते. तेव्हा गाडीतील लोकांनी आपली टोपी दाखवून रझाकार अत्याचार करत असल्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला .पोलीस ठाण्यातील कारकून अब्दुल करीम दिनांक २८ जुलै १९५० ला सोलापूरच्या कलेक्टरची साक्ष झाली .तर या दिवशी कळंबच्या सब-इन्स्पेक्टर ने वसंत नावाच्या माणसाला पकडून आणून उस्मानाबाद पोलिस कस्टडी केल्यानंतर त्याला तेथील झाडांना पाणी घालायला सांगितले होते. तेव्हा त्याने पाहिले की पोलिसांनी उपळ्याच्या ८ लोकांना पकडून आणले होते. तर कलेक्टरच्या घरचा शिपाई रामचंद्रने साक्ष दिली कि , त्या रात्री कस्टमचा डी.एस.पी. झामनखान हैदरच्या घरी आला आणि त्याने विचारले कि, उपळ्याच्या लोकांचे काय करावे ? त्या वेळी ही हैदरने त्यांना संपवून टाका अशा अनेक बाजूने तपास झाला. 

खटल्याच्या दरम्यान काही मुद्दे पुढे आले. त्यानुसार अहमद लतीफ नावाच्या माणसाने केरोसिनच्या दुकानातून रॉकेलचे पाच डबे आणले होते. याशिवाय त्याच रात्री काही रोहिले ट्रकमधून आले आणि रॉकेल घेऊन गेले. रेशन दुकानदाराने अशा प्रकारची साक्ष नोंदवली . कदाचित याच रॉकेलचा वापर उपळ्याच्या लोकांना आणि त्यांच्या गाड्या जाळण्यासाठी केला असेल आणखी एका उलटतपासणीनुसार सय्यद इब्राहिमने ४४ पोती शेंगा उस्मानाबादच्या प्रेमराज नावाच्या व्यापाऱ्याला विकल्या परंतु इब्राहिमने नंतर जबानी बदलली व शेंगा स्वतःच्या शेतातील असल्याचे सांगितले , तर झामनखानने ३ बैलगाड्या आणि ६ बैल अब्दुल रशीद नावाच्या व्यापाऱ्याला विकले. याचबरोबर घटनेच्या दिवशी गडाच्या दौऱ्यावर असणाऱ्या अधिकाऱ्यांची प्रवास भत्त्याची बिले तपासण्यात आली. 
  पुढे उपळा मर्डर केसमध्ये हैदरभोवती फास आवळण्यात आला.आपला बचाव करताना त्यांने असे सांगितले की, घटनेच्या दिवशी कस्टमच्या लोकांना गाडीवाल्यांना फक्त अटक करण्यास सांगितले होते. त्यानंतर काय झाले मला माहिती नाही. पोलीस ऍक्शन मध्ये पोलीस ठाणे आणि जेलमधील कागदपत्रे जळाल्याने याविषयी ठोस कागदपत्रे उपलब्ध झाली नाहीत. अध्यापपर्यंत कुणीही गाडीवाल्यांना मारून टाकल्याचे ठोस ठिकाणापर्यंत दाखविले नाही . हे काम कस्टमचे सहा क्लर्क आणि सहा पठाणांनी केल्याचा अंदाज होता . कदाचित कस्टम एस.पी. जमानखानाने माहिती असूनही हैदरला याची कल्पना दिली नाही . केसला सुरुवात झाली तेव्हा समजले की , तो पाकिस्तानला पळून गेला आहे. 

आज उपळ्याच्या च्या घटनेला ७२ वर्ष पूर्ण होऊन गेली काळानुरूप घटना विस्मरण होणे स्वाभाविक असते. गडावर उपळ्याच्या निरापराध मुलांचे बळी गेले. त्यांची चूक ती काय ? त्यांनी डोक्यावर गांधी टोपी घातलेली आहे . ते आझाद हिंदुस्थानातील उपळ्याचे रहिवासी आहेत. चिमुकल्या जीवांना जिथं आमचं आणि तुमच फरक कळत नाही. त्या ठिकाणी त्यांना देश परदेश काय कळणार ?
१९५० ला उपळ्याचे प्रकरण गुलबर्गा कोर्टाचे उस्मानाबाद जिल्हा न्यायालयात " उपळा मर्डर केस " या नावाने खूप गाजले होते. तत्पूर्वी १८ मे १९४८ ला केसरी वर्तमानपत्राने या विषयी ठळक बातमी देऊन आवाज उठविला होता. गावचे पोलीस पाटील अंबऋषी साहेबराव पाटील आणि शंकर श्रीपती पडवळ , बळवंतराव घोगरे यांनी या खटल्यासाठी मेहनत घेतली. 

१२ निरापराधांची अमानुषपणे हत्या करूनही मुख्य आरोपी शेवटपर्यंत मोकाटच राहिले. तरी सुद्धा घटना प्रमुख म्हणून उस्मानाबादचे कलेक्टर मोहम्मद हैदर आरोपीच्या पिंजर्‍यात सापडणे .अपहरण, खून आणि लूट याप्रमाणे अनेक गुन्ह्याची कलमे लावली गेली. निकालाचा दिवस होता ६ नोव्हेंबर १९५० फाईल नंबर ९/२,१९५० नुसार उस्मानाबाद जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश जसवंतराव यांनी आरोपी कलम २४३ , ६६ , ३३१ , ३०१ , एच.पी .सी .नुसार १० वर्षांचा सश्रम कारावास आणि ५०००/- रुपये दंड ठोठावला. ज्यावेळी कलेक्टरला १६००/- रुपये पगार होता . तेव्हा ५०००/- रुपयांची रक्कम भारी होते. परंतु आरोपीच्या शिक्षेने बळी गेलेल्यांच्या जीव माघारी येत नसतो. उपळे गावाची ऐकून विनोबा भावे यांनी भेट भूदान चळवळीची माहिती देताच अनेकांनी आपल्या ५ - ५ एकर जमीनी गरिबांना दान केल्या . तर १९५३ साली स्थापन झालेल्या पंतप्रधान जवाहरलाल नेहरू उस्मानाबाद जात असताना थांबून त्यांनी गावकर्‍यांचा सत्कार स्वीकारून त्यांची विचारपूस केली . १९४५ साली स्थापन झालेल्या उपळ्याच्या शाळेने अनेक सुशिक्षित तरुण निर्माण केले . गावचे नाव माकडाचे उपळे असून, गावचे नागरिक नावानुसार चांगल्या कामाला मदत तर वाईटांना पंजा हाणायला कमी करत नाहीत . त्यामुळे इथल्या माणसाबरोबर इथली मातीही वीरांची भूमी आहे. 

साभार :
डॉ.सतिष कदम ( सर )
मो. ९४२२६५००४४